कारचालकाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू तरडगाव – फलटण मार्गावर भीषण अपघात
तरडगाव – फलटण मार्गावर भीषण अपघात.
लोणंद प्रतिनिधी │ दिनांक : 19 ऑक्टोबर 2025
फलटण ते लोणंद या मार्गावर तरडगाव हद्दीतील चाळशीमळा परिसरात रविवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाळकृष्ण श्रीरंग गायकवाड (वय 63, रा. दिवाणवाडा, तरडगाव, ता. फलटण, जि. सातारा) हे आपल्या टीव्हीएस ज्युपिटर (क्रमांक MH-11-CE-4690) या दुचाकीवरून लोणंदच्या दिशेने जात होते. त्यावेळी मागून येणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी कारने भरधाव वेगात दुचाकीला जोराची धडक दिली.
या अपघातात बाळकृष्ण गायकवाड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून पसार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे.
या घटनेची माहिती मृत व्यक्तीचे पुतणे हर्षद हेमंत गायकवाड (वय 29, रा. पुणे, मुळ रा. तरडगाव) यांनी लोणंद पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून मोटार वाहन कायद्याचे कलम 184, 134(a)(b) प्रमाणे अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर अपघातस्थळी सपोनी सुशील भोसले यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.
घटनेचा पुढील तपास सपोफौ येळे हे करीत आहेत.








