क्राईम

लोणी गावात बेकायदेशीर हातभट्टी दारू विक्रीचा पोलिसांकडून परदाफाश..


लोणी (ता. खंडाळा), दि. 13 नोव्हेंबर 2025 — हातभट्टीची बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्याविरोधात शिरवळ पोलिसांनी कारवाई करून एकाला ताब्यात घेतले. ही कारवाई गुरुवारी दुपारी अंदाजे 2.15 वाजण्याच्या सुमारास लोणी–भादवडे रस्त्यालगत करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, मानसिग शांतीलाल कुंभार (वय 60, रा. लोणी, ता. खंडाळा) हा आपल्या राहत्या घराच्या आडोशाला परवाना नसताना चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने हातभट्टीची दारू बाळगत असल्याची गोपनीय माहिती शिरवळ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता कुंभार हा ठिकाणी आढळून आला.

कारवाईदरम्यान पोलिसांनी अंदाजे 400 रुपये किमतीची, उग्र वासाची सुमारे 8 लिटर हातभट्टी दारू जप्त केली. दारू 10 लिटर मापाच्या पांढऱ्या रंगाच्या प्लॅस्टिक कॅनमध्ये साठवलेली होती. पंचनामा करून दारूचे नमुने स्वतंत्र काचेच्या बाटलीत घेतण्यात आले.

या प्रकरणी महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम 65 (ई) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीला बीएनएसएस 35(3) प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे.

कारवाई मपोहवा फरांदे यांच्या तक्रारीवरून करण्यात आली असून पुढील तपास सपो पावरा, शिरवळ पोलिस स्टेशन, यांच्याकडे सुरू आहे. संपूर्ण कारवाई पो.नि. नलवडे, प्रभारी अधिकारी शिरवळ पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

स्थानिक परिसरात बेकायदेशीर हातभट्टी विक्री वाढत असल्याने नागरिकांनी पोलिस कार्रवाईचे स्वागत केले असून अशा अवैध धंद्यांवर आळा बसावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *